सिमेंटने भरलेला कंटेनर शास्त्री नदीत पडला: चालक, क्लिनर बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्‍वर

भरधाव वेगाने मुंबईकडून गोव्याकडे सिमेंट भरून निघालेला कंटेनर वळणाचा अंदाज न आल्याने शास्त्रीपुलावरून थेट शास्त्री नदीत पडण्याची घटना मंगळवारी रात्री 10 वाजता घडली. रात्रभर शोधकार्य करूनही कंटेनरचा चालक वा क्लिनरचा पत्ता लागलेला नाही. आज दुपारी कंटेनर पाण्याबाहेर काढण्यात आला. यावेळी अर्धा तास मुंबई – गोवा महामार्ग ठप्प झाला होता.

काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून गोव्याकडे जाणारा एक ट्रक नदीत कोसळताना ग्रामस्थांसह वाहनचालकांनी पाहिले त्यानंतर एकच कल्लोळ झाला. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्‍वर पोलिसांसह शेकडो ग्रामस्थ घटनास्थळावर दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी उलट बाजुने नदीपात्रात जावून कंटेनरमध्ये माणसे आहेत का याची चाचपणी केली मात्र पुढचा भाग पूर्णतः पाण्यात असल्याने कशाचाही अंदाज आला नाही. घटनेची माहिती मिळताच राजु काकडे हेल्प अ‍ॅकॅडमी देवरूखचे जयवंत वाईकर, अण्णा बेर्डे, सिध्दु वेल्हाळ, विशाल तळेकर, दिपक गेल्ये, दिलीप गुरव, बाळू आंबवकर, राजु वणकुद्रे, विनायक लिंबुकर आदी सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक उदय झावरे, वाहतूक पोलिस झापडेकर आदींसह कर्मचारी आणि काकडे हेल्प अ‍ॅकॅडमीचे सदस्य व स्थानिक ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्र शोधून काढले मात्र कंटेनरमधील कुणाचाही शोध लागला नाही. रात्री एका क्रेनच्या सहाय्याने कंटेनर काढण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याला यश आले नाही.

सकाळी 11 वाजता दुसरी क्रेन मागवून शास्त्रीपुलावर रस्ता बंद करून अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कंटेनर रस्त्यावर आणण्यात यश आले. अर्ध्या तासात मुंबई – गोवा महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. दरम्यान कंटेनर वर काढल्यानंतरही चालकाचा किंवा आतील कुणाचा मागमुस लागलेला नाही हे विशेष.

या कंटेनरमध्ये चालक आणि क्लिनर हे दोघेच होते कि लांब पल्ल्याचा कंटेनर असल्याने अन्य एक जादा चालक पण होता याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. या कंटेनरच्या मालकाला बोलावून घेण्यात आले आहे.