परभणी जिल्ह्यात रुग्णांसोबतच कन्टेंटमेंट झोनही वाढले

675

परभणी जिल्ह्यात कोरोना 67 रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल 31 रुग्ण सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात परभणी शहरातील 12, पूर्णा तालुक्यात 10, सेलू तालुक्यात दोन, गंगाखेड तालुक्यात पाच व जिंतूर तालुक्यात दोन कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 67 झाली आहे. परभणी जिल्ह्यातील सहा गावासह परभणी शहरातील पाच व गंगाखेड शहरातील तीन कॉलन्या कन्टेनमेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केले आहेत. एकदम इतके परिसर कन्टेनमेंट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मंगळवारी रात्री इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले.

दरम्यान, ज्या भागात मंगळवारी रुग्ण सापडले आहेत ते सर्व भाग जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. यात परभणी शहरातील इटलापुर मोहल्ला, त्रिमुर्तीनगर, कारेगाव रोड, नागसेन नगर व नानलपेठ या पाच वसाहतींचा समावेश आहे. तसेच परभणी तालुक्यातील कारेगाव हे देखील प्रतिबंधित करण्यात आले आहे. पूर्णा तालुक्यातील कमलापूर, सेलू तालुक्यातील चिकलठाणा व देवगावफाटा हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. गंगाखेड शहरातील शिवशाही नगर, सिध्दार्थ नगर व यज्ञभूमी हा परिसर नागरीकांच्या येण्या जाण्यासाठी प्रतिबंधिक करण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी व पिंपरी हे दोन गाव प्रतिबंधित करण्यात आले आहेत असे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

दरम्यान, प्रतिबंधीत क्षेत्रातील गावे व वसाहती सील करण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे. आरोग्य सेवा व जिवनावश्यक वस्तूचा पुरवठा करणाऱ्या वस्तूची वाहतुक करणारी वाहने व मनुष्य यांनाच या क्षेत्रात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाश्यांना या क्षेत्राच्या बाहेर पडण्यास मनाई आहे. सर्व प्रतिबंधीत क्षेत्रात आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण सुरु आहे असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले.

आपली प्रतिक्रिया द्या