दोन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन अखेर मागे, बेस्ट कामगार सेनेच्या दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावर सेवा करणाऱ्या सुमारे 500 चालकांनी वेतन मिळत नसल्याने गेले दोन दिवस पुकारलेले काम बंद आंदोलन बेस्ट कामगार सेनेच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. बेस्ट कर्मचारी सेनेच्या दणक्यानंतर कंत्राटदाराने रखडलेला पगार कामगारांना दिल्याने काम बंद आंदोलन मागे घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी जाहीर केले.

बेस्टमध्ये भाडेतत्त्वावरील बसचालकांचे कंत्राट घेतलेल्या एम. पी. ग्रुप या कंपनीने पगार थकवल्याने वडाळा, वांद्रे, विक्रोळी, कुलाबा, कुर्ला या आगारांतील बसचालकांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे या पाच डेपोंतून 275 बसेसचे शेडय़ूल असताना प्रत्यक्षात 74 बसेस सुटल्याने प्रवाशांना इतर वाहतूक साधनांचा आधार घ्यावा लागला. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने 104 जादा फेऱया चालवून प्रवाशांना दिलासा दिला. खासगी एम. पी. ग्रुप या कंत्राटदाराने गेली तीन महिने कर्मचाऱयांचा पगार दिला नसल्याने कामगारांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन केले. त्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी वेट लीज कामगार सेनेचे युनिट प्रमुख दानसिंग रावत, भूपेंद्र नांदोस्कर यांच्यासह वडाळा व इतर आगारांतील कामगारांची प्रत्यक्ष भेट घेतली. सामंत यांनी एम. पी. ग्रुप कंपनीच्या मालकाशी तातडीने बोलणी करून कामगारांची देणी परत करण्यास सांगितले. सामंत यांच्या मध्यस्थीने एम. पी. ग्रुपच्या मालकाने सर्व कामगारांच्या थकीत वेतन आजच त्यांच्या खात्यात जमा केले.

कंत्राटदारावर होणार कारवाई

बेस्टने वेट लीजच्या बस कंत्राटदारांशी केलेल्या कराराचा भंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एम. पी. ग्रुपवर अटी आणि शर्तींचा भंग झाला असल्याने त्यांच्यावर कारवाई करणार आहे. कंत्राटातील अटी आणि शर्तीनुसार दंडवसुलीपासून ते थेट कंत्राट रद्दबातल करणे यापैकी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.