
सामना प्रतिनिधी । कन्नड
सावकार पैशासाठी त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी देत असल्याने कॉन्ट्रॅक्टरने शहरातील एका हॉटेलमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहरातील हॉटेल रामकृष्ण महल येथे घडली. भाऊसाहेब काशीनाथ घुगे (50) असे कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे.
बुधवारी सकाळीच्या दरम्यान हॉटेल रामकृष्ण महल येथील खोली क्रमांक 103 मध्ये मेहेगाव येथील कॉन्ट्रॅक्टर भाऊसाहेब काशीनाथ घुगे यांनी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊसाहेब घुगे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात सुभाष रामगोपाल भारुका ,संदेश सुभाष भारुका (दोघेही रा.कन्नड), विष्णू किसन कळागते (रा.केडगाव, जि. नगर) आणि अशोक भाऊसाहेब पानकडे (रा.गंगापूर) या चौघांकडून भाऊसाहेब यांनी पैसे घेतले होते ते पैसे परतही दिले होते. मात्र वरील चौघेही पैसे परत न दिल्याचे सांगून जिवे मारण्याची धमकी देत होते. शिवाय सुभाष भारुका आणि संदेश भारुका हे भाऊसाहेब घुगे यांना कोर्टात तारखेस गेल्यानंतर तेथेही धमक्या देऊन त्रास देत होते.
सदर चिट्ठी पोलिसांनी हस्तगत केली असून, मृत भाऊसाहेब यांचे भाऊ सुरेश काशीनाथ घुगे यांना ही बाब समजली असता त्यांनी सुभाष भारुका, संदेश भारुका, विष्णू कळागते, अशोक पानखडे यांनी पैसे परत घेतल्यानंतरही पैशासाठी विनाकारण त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याची तक्रार कन्नड पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मृत भाऊसाहेब घुगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भाऊसाहेब घुगे यांच्यावर मेहेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य पुढील तपास करत आहेत.

































































