बाजारपेठेत कोथिंबीरीचे भाव गडगडले, अवघ्या एक रुपयात मिळतेय जुडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशांतर्गत बाजारपेठेत आवक वाढत असल्याने पालेभाज्यांच्या दरात तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हायब्रीड कोथिंबिरीला शुक्रवारी अवघा एक रुपया जुडी भाव मिळाला.

नाशिक बाजार समितीतून दररोज 70 ते 80 गाड्या भाजीपाला मुंबईला रवाना होतो. गुजरातमध्ये तीस, पुण्याला दोन, इंदोर येथे तीन ट्रक भाज्या दररोज पाठविल्या जातात. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने मुबलक पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे देशभरात स्थानिक भाजीपाल्याचे उत्पादन अधिक झाले आहे. परिणामी देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर स्थानिक आवक असल्यामुळे गेल्या पंधरवड्यापासून दर घसरत आहेत.

नाशिकच्या बाजार समितीत शुक्रवारी सायंकाळी कोथिंबिरीची आवक 75 हजार जुड्या होती. गावठी कोथिंबिरीला किमान 2, कमाल 12, सरासरी 8, तर हायब्रीडला 1-10-6 असा प्रती जुडी दर मिळाला. शापूचा सरासरी दर अवघा 4 रूपये होता. मेथीची आवक 64 हजार 500 जुड्या व दर 2-8-5 असे होते. पालकाला 2, कांदापातीला 22, पुदीना जुडीला 12 रूपये याप्रमाणे सरासरी भाव पुकारला गेला.