कोरोना आणि बिबट्याच्या दहशतीमुळे उरणकरांना घरातून बाहेर पडणे मुश्किल

482
फाईल फोटो

जगातील व देशातील जनता कोरोनाच्या दहशतीखाली आपले जीवन जगत असताना उरण शहरातील मोरा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने उरणात कोरोना बरोबर बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशी भीतीच्या सावटाखाली आपले जीवन जगत आहेत. मोरा परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी या परिसरातील रहिवासी व्यक्त करीत आहेत.

उरण तालुक्यातील महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माती उत्खनन करण्याचे परवाने दिल्याने मोठ्या प्रमाणात माती उत्खनन करण्याची कामे ही खासगी, वन, सिडकोच्या अधिपत्याखाली असलेल्या जागेतून सुरू आहेत. त्यामुळे सततच्या उत्खननामुळे वन प्राणी हे सैरभैर झाले असून ते नागरी वस्तीत आपला मोर्चा भक्ष्य शोधण्यासाठी वळवित आहेत. परंतु सध्या जगात देशात कोरोनाची दहशत निर्माण झाली असताना एन.ऐ.डीच्या जंगलात पुन्हा एकदा बिबट्या वावरत असल्याची खबर रहिवाशांमध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे.

हा बिबट्या भक्ष्य शोधत खारफुटीच्या जंगलातून आला असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एक बिबट्या एनएडीच्या जंगलात दिसला होता. आत्ता देखिल बेलधारवाडा, भवरा येथे काही नागरीकांना दिसला असल्याचे सांगण्यात येते. 6 महिन्यांपूर्वी गव्हाण परिसरात बिबट्या दिसला होता. गव्हाण भागातून खारफुटीच्या जंगलातून हा उरणच्या दिशेने आला असण्याची शक्यता आहे. वनविभागाकडून या बिबट्याचा शोध घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या