राज्यात बीए व्हेरिएंटच्या रुग्णांत वाढ; 141 पैकी 133 रुग्ण पुण्यातील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी कोरोनाच्या बीए व्हेरिएंटच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात एकाचवेळी 141 रुग्ण सापडले. यापैकी 133 रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. दरम्यान, राज्यात दिवसभरात 1 हजार 849 कोरोना रुग्ण सापडले तर तिघांचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी असताना पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दिलेल्या अहवालाने चिंता वाढवली आहे. अहवालानुसार, राज्यात बीए-5 चे 52 तर बीए-4चे 10 रुग्ण सापडले. त्याचबरोबरोबर बीए 2.75 या व्हेरिएंटचे 79 रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 141 रुग्णांपैकी 133 रुग्ण हे पुण्यातील असून उर्वरित 8 रुग्ण हे सोलापूरमधील आहेत. पुण्यातील इन्साकॉग प्रयोगशाळेत सर्वांची तपासणी करण्यात आली. या रुग्णांवर उपचार सुरू असून वैद्यकीय आढावा घेतला जात आहे. दरम्यान, राज्यात एकूण बीए-4 आणि 5 व्हेरिएंटची रुग्णसंख्या 258 तर बीए 2.75 व्हेरिएंटची रुग्णसंख्या 199 वर पोहोचली आहे.

बीए-4 आणि बीए-5 रुग्णसंख्या
पुणे-163, मुंबई-51, ठाणे-16, रायगड-7, सांगली-5, नागपूर-8, पालघर-4, कोल्हापूर-2

बीए 2.75 रुग्णसंख्या
पुणे-127, नागपूर-33, यवतमाळ-12, सोलापूर-8, मुंबई-5,अकोला-4, ठाणे-3, वाशिम-2, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली येते प्रत्येकी 1 रुग्ण सापडला.

मुंबईत 322 रुग्ण
मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 322 रुग्ण सापडले तर दोघा जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 298 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 24 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 8 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले. दिवसभरात 236 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 901 वर पोहोचली आहे.