
हिंदुस्थानात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आली असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे पुन्हा एकदा जनजीवन सुरळीत झाले आहे. मात्र दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपात मागील काही दिवसांपासून झालेल्या कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकार देखील अलर्ट झाले आहे. चीन व युरोपात वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने हिंदुस्थानात सर्व राज्यांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना व केंद्रशासित प्रदेशांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी सर्व राज्यांना कोरोना चाचण्यांवर भर देण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाचा नवा व्हेरिएंट पसरत असल्याचे निदर्शनास आल्यास वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या जाव्यात असे सांगण्यात आले आहे. भूषण यांनी पत्रात म्हटले आहे की, ज्या नागरिकांचे लसीकरण अद्याप बाकी आहे, त्यांना लसीकरणासाठी प्रेरित करायला हवे. यासोबतच सर्व राज्यांनी फाइव्ह फोल्ड स्ट्रॅटजीचा अवलंब करून टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करावे.
पूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ पाहता, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. ज्यामध्ये राज्यांनी जीनोम सिक्वेन्सिंगवर भर देण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. तसेच गाफील न राहता परिस्थिती वेगाने हाताळावी असे सांगण्यात आले आहे.
हिंदुस्थानातील रुग्णसंख्या किती
हिंदुस्थानात गेल्या 24 तासात 2,528 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 3,997 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला तर एकूण 149 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 29,181 एवढी आहे. देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे 5,16,281 नागरिकांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत एकूण 1,80,97,94,58 जणांचे लसीकरण झाले आहे.
























































