चीनमध्ये कोरोनाचा धुमाकूळ; 26 शहरांमध्ये लॉकडाऊन, 21 कोटी लोक घरांत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा उगम होऊन दोन वर्षे उलटल्यानंतर सर्व उपाय करूनही चीन सरकारला कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे. चीनच्या 26 शहरांत अंशतः, अर्धे किंवा पूर्णत लॉकडाऊन निर्बंध लागू झाले आहेत. निर्बंधामुळे तब्बल 21 कोटी लोक घरात कैद झाले आहेत, तर 1 मे रोजी होणाऱया मजूर दिनाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी घातली गेली. चीनच्या मागील 73 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मे दिनाचे आयोजन झाले नाही.

 आर्थिक राजधानी शांघाय शहरामध्ये कडक लॉकडाऊन आणि बीजिंगमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या मुद्यांवर मौन बाळगून आहेत. एप्रिलमध्ये जिनपिंग यांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली, पण कोरोना किंवा लॉकडाऊनबाबत कोणतेच वक्तव्य केले नाही. इतकेच नाही, तर 2.5 कोटी लोकसंख्येच्या शांघायच्या लोकांना टीव्हीवरही संबोधित केले नाही. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राचे माजी संपादक डेंग युवेन सांगतात, ‘जिनपिंग असे जाणीवपूर्वक करीत आहेत. कारण लोकांमध्ये लॉकडाऊन व इतर निर्बंधांबाबत रोष आहे.’

8 प्रांतांमध्ये दोन महिन्यांपासून शाळा बंद

चीनच्या झिजिंगयान, जिलिन, शांघाय, बीजिंगसह 8 प्रांतांत सुमारे 2 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. इथे ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिनपिंग सरकारने या प्रांतांतील शाळांत शिकणाऱया प्राथमिक मुलांच्या कोरोना चाचणीचे आदेश दिले आहेत. मुलांना घरातून आणून चाचणी घेतली जात आहे.