कोरोना नियंत्रण ठेवण्यास अपयश, जपानचे पंतप्रधान राजीनामा देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जपानमधील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यास अपयश आल्यामुळे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे राजीनामा देणार आहेत. याबाबत सुगा यांनीच आज घोषणा केली.

गेल्यावर्षी शिंजो आबे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर योशिहिदे सुगा यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोव्रेटिक पक्षाकडून पंतप्रधानांची निवड करण्यासाठी 29 सप्टेंबरला पक्षांतर्गत निवडणूक होणार आहे. तत्पूर्वीच शुक्रवारी सुगा यांनी आपण पंतप्रधानपदासाठी इच्छूक नसल्याचे जाहीर केले. कोरोना आणि निवडणुक या दोन्ही जबाबदाऱया मी पार पाडू शकत नाही. यातील एकाची निवड करणार असून, कोरोनाविरूद्धची लढाई सुरू ठेवेन असे योशिहिदे सुगा म्हणाले. त्यामुळे सुगा लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील. नवीन नेत्याची निवड होईपर्यंत ते पंतप्रधानपदावर राहतील.

ऑलिम्पिक आयोजनावरूनही देशभरात टीका

कोरोना संसर्ग असताना टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन केल्याबद्दल सुगा यांच्यावर जपानमध्ये टीका होत होती. ऑलिम्पिकनंतर संसर्ग वाढला. सध्या देशात आरोग्य आणीबाणी लागू केली आहे. जपानमध्ये रुग्णसंख्या 15 लाखांवर गेली आहे.