टेन्शन संपणार; खत कंपन्या पुरविणार 50 मेट्रिक टन ऑक्सिजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात अनेक ’ठिकाणी कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक राज्यांत ऑक्सिजनचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. देशभरातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी देशातील खत कंपन्यांनी एक पाऊल पुढे टाकले असून देशातील खत कंपन्यांकडून दररोज 50 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भातील घोषणा रसायने आणि खते मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय रांनी केली.

देशात विविध ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून रसायने आणि खते मंत्रालय, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मांडवीय यांनी यावेळी खत कंपन्यांना त्यांच्या ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या क्षमतेच्या स्थितीचा पुन्हा अंदाज घेऊन आणि रुग्णालयांना वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात अधिक वृद्धी करून या महामारीच्या काळात समाजाला सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

या बैठकीतील प्रमुख मुद्दे

  • इफ्कोच्या गुजरातमधील कलोल युनिटमधे ताशी 200 क्युबिक मीटर ऑक्सिजन निर्मिती संयंत्र लावण्यात येत असून त्याची एकूण क्षमता प्रतिदिन 33,000 क्युबिक मीटर इतकी असेल.
  • जीएसएफसीने आपल्या संयंत्रात लहान बदल करून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे.
  • जीएनएफसीने वायू विभाजन विभाग सुरू केल्यानंतर वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.
  • जीएसएफएस आणि जीएनएफसीने त्यांच्या ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
  • इतर खत कंपन्या औद्योगिक सीएसआरच्या माध्यमातील देशातील निवडक रुग्णालयात/जागांवर वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती संयंत्र उभारतील.