
कोरोना संकटाची सध्याची स्थिती आणि तिसऱया लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईत होणाऱया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी 5 व 6 जुलै या दोन दिवसांचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात झाली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अॅड. अनिल परब, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, विधान परिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, संसदीय कार्य विभागाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. बैठकीत पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भातील तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून विधान भवनात अधिवेशन कालावधीमध्ये प्रवेश करणाऱया सर्व अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांच्याकरिता लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधान भवन परिसर प्रवेशाकरिता सर्वांना ‘आरटी-पीसीआर’ कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. विधान भवनात 3 व 4 जुलै रोजी ‘आरटी-पीसीआर’ चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
एका आसनावर, एकच आमदार
सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशा प्रकारे व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. आमदारांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेसशिल्ड, मास्क, हॅण्डग्लोव्हज, हॅण्ड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहे.
गर्दी टाळणार
गर्दी होऊ नये यासाठी विधान मंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये करण्यात येणार आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱयाला प्रवेश देण्यात येईल. तसेच अधिवेशन कालावधीत व्हिजीटर्सना प्रवेश देण्यात येणार नाही. याचबरोबर मोजके अधिकारी व कर्मचाऱयांना प्रवेश देण्यात येईल.
























































