
कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या माजी खासदार रामशेठ ठाकूर, डॉ. जगन्नाथराव हेगडे आदींचा कोरोना देवदूत पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले.
दैनिक शिवनेरतर्फे राजभवन येथे आयोजित या सोहळ्यात डॉ अमेय देसाई, प्रशांत कारुळकर व लीलाधर चव्हाण यांचाही कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदान शिबिर आयोजित करून अधिकाधिक रक्त संकलन करणाऱ्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव, काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ आणि गं.द.आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ या मंडळांना यावेळी गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह, शिवनेरचे संपादक तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे गव्हर्नर राजकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.


























































