
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्टच्या वाहतूक शाखेच्या 55 वर्षांवरील कर्मचारी वर्गाला ड्यूटीपासून आराम दिला जाणार आहे. पोलिसांच्या आधीच बेस्टने प्रथम हा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘खरे तर पोलिसांआधी बेस्टने हा निर्णय घेतला आहे. परंतू बेस्टमध्ये प्रत्येकाची तपासणी केली जाते आहे. बेस्टचा जॉब हा हार्ड जॉब असल्याने 55 वर्षांपर्यंतच्या सर्वच ड्रायव्हर आणि कंडक्टरला कसली ना कसली शारीरिक व्याधी जडलेली असते. त्यामुळे 55 वर्षांवरील 10 टक्के (सुमारे 600 कर्मचारी) घरीच बसतील असेही सामंत यांनी सांगितले.
ड्रायव्हरची केबिन सिल करा!
बेस्टमध्ये प्रवाशांशी संपर्क न येण्यासाठी ड्रायव्हरची केबिन सिल करण्याची गरज आहे. त्यामुळे ड्रायव्हर आणि कंडक्टर पुढच्या पुढे सुरक्षित राहतील. तसेच तिकीटे आधीच काढून प्रवासी प्रवास करतील. बेस्ट प्रशासनाने आता सॅनिटायझर पुरविले असले तरी हातमोजे अजूनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.
बेस्टमध्ये सध्या सर्वच ड्रायव्हर आणि कंडक्टरांची सध्या तपासणी केली जात आहे. बेस्टमध्ये शारीरिक दृष्ट्या फिट नसलेल्या कामगारांना यापूर्वीच हलक्या स्वरुपाची ड्यूटी दिली जात आहे. बेस्टच्या एकूण 15 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी विद्युत पुरवठा विभागाच्या एका कर्मचाऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यु झाला आहे. बेस्टच्या परीवहन उपक्रमाचे 7 कंडक्टर, 4 ड्रायव्हर, 2 बेस्ट विद्युत विभाग कर्मचारी, 2 परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह झाले आहेत.
कोरोना साथीच्या संकटामुळे मुंबईतील अत्यावश्यक समाज घटकांना बेस्ट दररोज सुमारे तीन हजार फेऱ्या चालवत आहे. या बसेसमध्ये अनेक प्रवासी सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने बेस्ट कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनेक फेऱ्यांमध्ये बेस्टने कंडक्टर पुरविणे बंद केले आहे.



























































