
कोरोनामुळे राज्यात संचारबंदी सुरू असताना विविध सोशल मीडियावर अफवा पसरविल्याप्रकरणी तब्बल 115 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य सायबर शाखेकडून अफवा पसरविणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात असून, कोणीही अफवा न पसरविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक हरीश बैजल यांनी दिली आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातही 21 दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. मात्र, असे असतानाही अनेकजण सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. तसेच काही खोट्या बातम्या तयार करून त्यावर नामांकित मीडियाच्या लोगोचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिसांनी खोटी माहिती पसरविणाऱ्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सायबर शाखेकडून संबंधिताविरुद्ध कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना नियंत्रण कक्षाला फोन करून खोटी माहिती देणाऱ्यास सायबर विभागाने पकडले होते. तसेच मटन, चिकन खाल्ल्याने कोरोना होतो असा व्हिडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्या परराज्यातील दोघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, राज्यात विविध ठिकाणी कोरोनाच्या अफवा पसरवणाऱ्यावर 115 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, याबाबत उपमहानिरीक्षक बैजल यांनी ट्विटकरून माहिती दिली आहे. तसेच कोणीही बातम्या किंवा खोटी माहिती पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
























































