
एका दिव्यांग मुलीचं लग्न कोरोनाच्या संकटामुळं अडचणीत आलं. चंद्रपुरातील मुलीचं लग्न 16 एप्रिल रोजी नागपुरात असल्यानं पित्यानं किमान पाच जणांना जाण्याची परवानगी मागितली आहे.
चंद्रपुरातील एका दिव्यांग मुलीचं लग्न नागपुरात जुळलं. कोरोनाच्या संकटाची कोणतीही कुजबुज तेव्हा नव्हती, जेव्हा हे लग्न जुळलं. घरातील सर्व मंडळी खुश होती. मुलीचे पिता सदाशिव बावणे हे लग्नाच्या तयारीला लागले. पैशांची जुळवाजुळव केली. पत्रिका छापल्या, त्या नातेवाईकांना वाटल्या. घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना कोरोनाचं संकट अचानक जगापुढं उभं ठाकलं. सरकारनं आधी 14 एप्रिलपर्यंत देशात संचारबंदी जाहीर केली आणि या कुटुंबाच्या आनंदावर निराशेची गडद छाया पसरली. पण लग्न 16 एप्रिलला असल्यानं लॉकडाऊनची अडचण येणार नाही, अशी अंधुक आस त्यांना होती. पण ही आशाही आता मावळली. या मुलीची आई दहा वर्षांपूर्वीच जग सोडून गेली. तेव्हापासून लहान भाऊ आणि पित्यानं तिला सांभाळलं. तिचं लग्न जुळत नव्हतं. त्यामुळं वडील विवंचनेत असायचे. अशा परिस्थितीत नागपुरातून एक स्थळ आलं. त्यामुळं पित्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यापेक्षाही हा आनंद मुलीला अधिक झाला. पित्याची अगतिकता तिला बघवत नव्हती. पण लग्न जुळताच हसायला लागली. आता हे लग्न निर्विघ्न पार पडावं, यासाठी मुलीच्या पित्यानं प्रशासनाला मदतीची याचना केली. किमान पाच लोकांना तरी जाऊ द्या. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावू, अशी विनंती त्यांनी केली आहे.


























































