
नांदेड शहरात 15 मार्च पासून वास्तव्यास असलेल्या इंडोनेशीयातील 10 नागरिकांसह दिल्ली येथील दोघांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व लोक 2 मार्च ते 8 मार्च हजरत निजामुद्दीन नवी दिल्ली येथील मरकज कार्यक्रमात हजर होते. नांदेडला आल्यावर त्यांनी आपण त्या कार्यक्रमात होतो ही बाब लपवली होती.
इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बाळू गिते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 एप्रिल रोजी त्यांना पोलीस नाईक शिवसांभ मारवाडे, निहरकर आणि शेख इमारान यांनी ही माहिती दिली की, इंडोनेशीयाचे दहा नागरिक ज्यात 5 पुरुष आणि 5 महिला तसेच दिल्ली येथील पती पत्नी असे 12 जण 15 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत नांदेड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास राहीले. त्या सर्वांची पोलिसांनी स्वॅब तपासणी केली. त्यात सध्या ते डॉक्टारांच्या निगराणीखाली आहेत.
या सर्वांचे पासपोर्ट, व्हिसा 2020 ते 2024 पर्यंत प्रत्येकाचे वेगवेगळ्या वर्षात वैध आहेत.
या सर्वांनी दिलेल्या माहितीनुसार 2 मार्च ते 8 मार्च ते मरकज मध्ये राहिले. 9 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील कुवा मस्जिदमध्ये राहिले. 10 मार्च रोजी अजून एकाच्या घरी थांबवले आणि 11 मार्च रोजी जुनी दिल्ली येथील दुसऱ्या जागी राहिले. 13 मार्च पर्यंत ते असेच वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन येथून ही सर्व मंडळी रेल्वेने नांदेडकडे निघाली. ते 15 मार्च रोजी सकाळी 7 वाजता नांदेडला पोहचले. नांदेडमध्ये 15 ते 19 मार्च हिलालनगर येथे थांबले. 19 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान हे सर्व विदेशी नागरीक अन्य व्यक्तीच्या घरी थांबले. 3 ते 4 मार्च दरम्यान रहेमतनगर येथे थांबले.
या सर्व लोकांच्या मोबाईलचे सी.डी.आर आणि एस.डी.आर. तपसले असता त्यांनी जमाव बंदी व संचारबंदी आदेश असतांना एका ठिकाणी न थांबता 5 पेक्षा जास्त लोक एकत्र जमून वेगवेगळ्या ठिकाणी संचार करत होते. विदेशी व्यक्ती अधिनियमाच्या कायद्यातील तरतूदीचे उल्लंघन केले. म्हणून इतवारा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 124/2020, कलम 188, 269, 270 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 च्या कलम 14 सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील, पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे. या सर्व लोकांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

























































