कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास सरपंचांची आडकाठी,सुमारे दोन हजार शाळा बंदच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुक्त गावांमध्ये आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी काही गावांतील सरपंचांनी ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न दिल्याने तब्बल दोन हजार शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. विविध कारणे सांगून, काही चिरीमिरीसाठी किंवा पूर्वग्रह ठेवून अनेक गावांतील सरपंचांनी शाळांना एनओसी दिली नसल्याचा आरोप महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (मेस्टा) केला आहे.

कोरोनामुक्त गावांमध्ये आजपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्यांच्या संमतीने शाळा सुरू कराव्यात अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या समित्यांकडून शाळांना एनओसी दिल्यानंतर शाळा सुरू केल्या जात आहेत. मात्र सरपंचांनी विविध कारणे सांगून, काही चिरीमिरीसाठी किंवा पूर्वग्रहदूषित हेतूने शाळांना एनओसी दिली नाही, ती अडवून ठेवली असल्याने आज शाळा सुरू करण्यात आल्या नसल्याचे ‘मेस्टा’ संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील सांगितले. अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.

संस्थाचालकांनी शिक्षण विभागाच्या आदेशानुसार शाळा सुरू करण्याची तयारी केली होती. एका शाळेत दहा ते पंधरा गावांतील विद्यार्थी स्कूल बसने येतात. अशा वेळी त्या सर्व गावांतील सरपंचांना शोधून त्यांच्या हातापाया पडत शाळा सुरू करण्याची संस्थाचालकांना परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे अनेक भागांत शाळा सुरू झालेल्या नाहीत. याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ‘मेस्टा’ने केली आहे.