साय-फाय : कोरोना पुन्हा उंबरठय़ावर आलाय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रसाद ताम्हनकर

चीनमध्ये सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी विश्वासू बातमी संस्थांतर्फे येणाऱया बातम्यांनी सगळ्या जगाला पुन्हा एकदा चिंतेत टाकलेले आहे. चीनने कोरोनाच्या विरुद्ध प्रभावी लढय़ासाठी ‘झीरो कोविड पॉलिसी’ अवलंबली होती. मात्र तिथल्या जनतेने या निर्णयाविरुद्ध डिसेंबरमध्ये उग्र आंदोलने चालू केली आणि शी जिनपिंग सरकारला हे धोरण मागे घ्यावे लागले. त्यामुळे लॉकडाऊन आणि कोरोना चाचणीमधून नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळाला. मात्र त्याचा परिणाम असा झाला की, नागरिकांच्या मुक्त हालचालींमुळे कोरोनाने पुन्हा एकदा उसळी घेतली आणि कोरोनाचा मोठय़ा प्रमाणावर उद्रेक झाला.

कोरोना चाचणीची अनिवार्यता संपल्याने नव्याने किती रुग्ण कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत त्याची माहिती मिळणे मुश्कील झाले. याच काळात ‘चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ या विभागाचा एक अहवाल ‘लीक’ झाला आणि जगात खरी खळबळ माजली. या अहवालानुसार डिसेंबरच्या पहिल्या 20 दिवसांत चीनमध्ये सुमारे 250 दशलक्ष जनतेला कोविडची लागण झालेली होती. त्यातच ‘चायनीज नॅशनल हेल्थ कमिशन’ने कोविड-19च्या धोक्याला ‘टाईप ए’वरून ‘टाईप बी’चा (अर्थात निरोगी लोकांना याचा काही धोका नाही) असा दर्जा दिला आणि जनता अधिक निर्धास्त बनली.

आता जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील प्रमुख देशांनी चीनमधील कोरोनाची परिस्थिती, रुग्णांची संख्या याचा पारदर्शक अहवाल देण्याची मागणी लावून धरली आहे. वृत्तसंस्था आणि सोशल मीडियावर चीन सरकारचे असलेले नियंत्रण यामुळे तिथे नक्की काय घडते आहे हे समजण्यास जगाला फारसा वाव नाही. थोडय़ाफार प्रमाणात सोशल मीडियावर येणाऱया पोस्ट आणि फोटो यावर माहितीचे सगळे काही स्रोत अवलंबून आहेत असे म्हणायला हरकत नाही. सगळे जग चीनकडे नजर लावून बसलेले असताना चीन सरकारने मात्र यावर हात राखून माहिती देत आहे.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे नियंत्रण असलेल्या वर्तमानपत्रात याच काळात एक बातमी छापून आली होती. ज्यात असा दावा करण्यात आला होता की, चीनच्या एक करोड जनसंख्या असलेल्या क्विग्दाओ शहरात रोज पाच लाख नवे संक्रमित रुग्ण समोर येत आहेत, परंतु या बातमीला ताबडतोब ‘सेन्सॉर’ करण्यात आले आणि या बातमीतले आकडे अदृश्य झाले.

चीनमध्ये ही परिस्थिती असताना अशी आणीबाणी उद्भवल्यास यावेळी हिंदुस्थानची तयारी किती आहे? हा प्रश्न सर्वांना सतावतो आहे. चीनची डिसेंबरमधली परिस्थिती बघता जगात सर्वच देशांमध्ये बैठक आणि नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या. सध्या आपल्या देशात चार हजारांच्या आसपास संक्रमित रुग्ण असल्याची आकडेवारी दाखवते. कोविडविरोधात उभारल्या गेलेल्या नॅशनल टास्क फोर्सने पुन्हा एकदा लोकांना मास्क वापरण्याचे, सुरक्षेसंदर्भात नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. देशातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये तिथल्या कार्यकारी समित्यांतर्फे मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. तसेच सुरक्षित अंतर ठेवण्यासदेखील सुरुवात झाली आहे.

कोरोनाचा कोणता नवा विषाणू हिंदुस्थानात दाखल होऊ शकतो आणि त्याचे परिणाम काय असतील हीदेखील एक प्रमुख चिंता आहे. एका अहवालानुसार हिंदुस्थानात आतापर्यंत 220 करोड लसी टोचण्यात आलेल्या आहेत. मात्र आजही सात करोड लोक असे आहेत, ज्यांनी दुसरी बुस्टर लस घेतलेली नाही. आरोग्य खात्याच्या माहितीनुसार देशात पहिल्या लसीचा डोस घेणाऱयांपैकी फक्त 23 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. ही आकडेवारी नक्कीच चिंताजनक आहे.

जगभरातील प्रमुख देश दुसऱया बुस्टर डोसचा आग्रह या काळात धरत असताना हिंदुस्थान सरकार यासाठी किती प्रयत्न करतो आहे हे बघणे महत्त्वाचे आहे. कोरोनाची लाट आल्यास किती रुग्णालयांत किती बेड उपलब्ध आहेत, आरोग्य यंत्रणांनी काय खबरदारी घेतली आहे, सामान्य जनतेने कोणाशी आणि कसा संपर्क साधावा याची योग्य तयारी करून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे.

– [email protected]