
पवई येथील आयआयटी मुंबईत कोरोना पुन्हा उद्भवला आहे. गेल्या 14 दिवसांत तिथे 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर आयआयटीच्या आवारातच बनवण्यात आलेल्या कोविड केंद्रात उपचार करण्यात येत आहेत.
आयआयटी मुंबईत 21 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीत 5 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयआयटीच्या आवारात राहणाऱया दोन कर्मचाऱयांच्या कुटुंबामध्ये 4 रुग्ण आढळले आहेत तर एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तो विद्यार्थी मुंबईबाहेर गेला होता. तिथून परतल्यानंतर त्याला सात दिवस क्वारंटाइन ठेवण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी 24 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीतही पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आयआयटीच्या व्यवस्थापनाने कोविड समिती बनवली आहे जी संस्थेतील परिस्थितीवर नजर ठेवून असते. या समितीने ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर आपल्या नियमावलीत काही बदल केले आहेत.






























































