पुणे – कोरोना संसर्गामुळे शाकाहारी झाले मांसाहारी!

कोरोना संसर्गाने राज्यात कहर केला आहे. प्रतिकारशक्ती वाढविणे, आनंदी राहणे, इच्छाशक्ती, नियमित व्यायाम यांसह मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सातत्याने हात धुणे यामुळे कोरोनापासून बचाव होऊ शकतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांना अंडी दिली जातात. असे रुग्ण लवकर बरे होत असल्याने वर्षानुवर्षे शाकाहारी असलेले तसेच मांसाहार वर्ज्य असलेले अनेक शाकाहारी कोरोना प्रादुर्भावामुळे मांसाहारी झाले आहेत. यामुळे ऐन उन्हाळ्यातही अंडी, चिकनची विक्री वाढली असून, दरवाढही झाली आहे. याबरोबरच घरोघरी फळे, खजूर व सुकामेवा दिसू लागला आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी आणि मांसाहार चांगला असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. एरवी उन्हाळ्यात अंड्याची मागणी कमी होते. त्याचा या व्यवसायाला फटका बसतो. यावेळी मात्र उन्हाळ्यातही अंड्यांची मागणी कायम असल्याचे अंडी विक्रेत्यांनी सांगितले. शहरात मुळातच अंडी विक्री जोमाने होते. शेकडो अंडाभुर्जीच्या गाड्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला. येथील अंडाभुर्जीचे विविध प्रकारही प्रसिद्ध आहेत. प्रामुख्याने कोरोनाबाधित रुग्ण अंडी उकडून खाणे, चिकन सूप, चिकन याबरोबरच डाळी, दूध, कडधान्य, मटण आदी पदार्थांना प्राधान्य देतात. घरोघरी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड याबरोबरच खजूर वापरले जात आहेत. ड्रायफ्रूटची विक्री वाढल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

चिकन, अंडीवर भर देतानाच शाकाहारींना त्यांचे मित्र, नातेवाईक आणि आप्तेष्ट मांसाहार करण्याचा सल्ला देत आहेत. अनेकांनी हा सल्ला मानला असला तरी मांसाहारापासून दूर राहण्याचा दृढ निश्चय केलेल्यांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डाळी, कडधान्य याबरोबरच शेवगा सूप आणि हळदीचे दूध यावर भर दिला आहे. एकूणच कोरोनाने अनेकांचे जीवनमान बदलले आहे. तसेच यापूर्वी असंख्य आजारांना, अपघातांना तोंड दिलेल्या व शाकाहारी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी मांसाहाराचा मार्ग पत्करला आहे. कोरोनाकाळात तसेच कोरोनाबाधित रुग्णांना प्रथिने (प्रोटिन्सयुक्त) पदार्थ मिळाल्यास त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते. चिकन, अंडी या माध्यमातून प्रथिने उपलब्ध होतात. हळद व तत्सम पदार्थ अॅन्टिबॉयटिक्सचे काम करतात. यामुळे अंडी, चिकन खाणे फायदेशीर ठरते. असंख्य रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर हळदीचे दूध घेतात. काही प्रमाणात प्रोटिन्सयुक्त पदार्थ लाभदायी ठरतात.

अंडी व्यवसायाला बरकतीचे दिवस

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या विविध रुग्णालयांत हजारो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान रुग्णांना नाश्त्यात अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अंडी खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अंड्यामध्ये ‘व्हिटॅमिन डी’ असते. ते हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक आहेत. ऐन उन्हाळ्यातसुद्धा अंडी व्यवसायाला बरकतीचे दिवस आले आहेत. अंडी पोल्ट्री व्यवसायातून लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात सहा ते आठ रुपयाला अंडे विकले जात आहे. हेच अंडे एप्रिल-मे मध्ये तीन ते चार रुपयाला विकले जात होते. आज त्या अंड्याची दुपटीने किंमत वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक लाखोंचे उत्पन्न घेत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे अंडी आणि चिकन व्यवसायावर मंदीचे सावट होते. परंतु, काही दिवसांनंतर चिकन आणि अंड्यांपासून रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे यावर्षी चिकन आणि अंड्यांना तेजी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या