
कोरोना आजाराविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अभ्यासानुसार, दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा रुग्णांना पूर्वीपेक्षा जास्त तीव्र लक्षणे जाणवू शकतात.
लॅन्सेट इन्फेक्टीव्ह डिसिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अमेरिकेच्या नेवाडा विद्यापीठातील शास्त्रज्ञांना 48 दिवसांच्या आत 25 वर्षांच्या तरूणाला दुसर्यांदा संसर्ग झाल्याचे आढळले. दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक तीव्र लक्षणे दिसून आली. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गातून बरे झालेल्या या रुग्णांना जूनमध्ये पुन्हा कोरोनाची लागण झाली. यावेळी त्यांच्यात ताप, डोकेदुखी, खोकला ही लक्षणे गंभीरपणे उद्भवली होती.
एकदा आपण कोरोना आजारातून बरे झालात म्हणून याचा अर्थ असा नाही की, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती पूर्णपणे विकसित झाली आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे. नेवाडा विद्यापीठाचे संशोधक मार्क पंडोरी म्हणाले, ‘अजूनही अनेक लोकांना कोरोना आजाराची लक्षणे आणि रोगप्रतिकारशक्ती बद्दल पुरेशी माहिती नाही. मात्र आमच्या अभ्यासातून असं समोर आलं आहे की, तुम्ही पहिल्यांदा कोरोनातून बरे झाल्यासही तुमच्यात पूर्णपणे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईलच, असे होत नाही.’



























































