महाराष्ट्राच्या तिजोरीला कोरोनाची लागण! उद्योग, सेवा क्षेत्राला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे मागील वर्ष सर्वच क्षेत्रांसाठी कठीण गेलं. याचा थेट परिणाम राज्याच्या तिजोरीवर झाल्याचा निष्कर्ष राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. देशाप्रमाणेच राज्याच्या आर्थिक विकास दरात 8 टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कृषी क्षेत्राची भरभराट सोडल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्राला मोठा फटका बसल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून त्याआधी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आज 2020-21 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. या अहवालात 2020 हे वर्ष कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांसाठी कठीण गेलं. त्यातही लघु उद्योग आणि बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम झाला असून देशाच्या व राज्याच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसल्याच निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

पूर्वानुमानानुसार देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत देखील उणे 8.0 टक्के वृद्धी अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर उद्योग क्षेत्रात 11.3 टक्के तर सेवा क्षेत्रात 9.0 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 1 लाख 56 हजार कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 3 लाख 47 हजार कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती, मात्र एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांत प्रत्यक्ष महसुली जमा केवळ 1 लाख 76 हजार 450 कोटी म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या फक्त 50.8 टक्के एवढीच आहे.

आरोग्यासाठी 744 कोटी 65 लाख रुपये खर्च

कोरोनाकाळात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांवर करण्यात आलेल्या खर्चाचा तपशीलदेखील या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सन 2020-21 मध्ये डिसेंबरअखेर 4 लाख 54 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया तसेच उपचार करण्यात आले. त्यापोटी 744 कोटी 65 लाख रुपये खर्च करण्यात आले.

शिवभोजनच्या 2 कोटी 81 लाख थाळ्यांचे वाटप

कोरोना महामारीच्या संकट काळात शिवभोजन योजनेचा मोठा आधार गरीबांना मिळाला. 906 शिवभोजन केंद्रामधून डिसेंबर 2020 पर्यंत 2 कोटी 81 लाख शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले. या शिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतूनही धान्य वाटप करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.

पायाभूत सुविधा निर्मितीवर भर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या आठ पदरी महामार्गासाठी डिसेंबर 2020 पर्यंत 92.3 टक्के जमिनीचे भूसंपादन झाले आहे.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे डिसेंबर 2020 अखेर 20 टक्के काम पूर्ण
मुंबई मेट्रो रेल प्रकल्पाचे दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द, कुलाबा-वांद्रे-सीप्झ, वडाळा-कासारवडवली-गायमुख, ठाणे-भिवंडी-कल्याण, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी व अंधेरी ते दहिसर-मीरा-भाईंदरची कामे प्रगतिपथावर
कोरोना काळात महाराष्ट्र देशातील सर्वाधिक इंटरनेट युजर असलेले राज्य बनले आहे. 2020 अखेर इंटरनेट ग्राहकांची संख्या 9.7 कोटी असून ती देशातील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे.
राज्याचा जीडीपी यंदा 5. 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला 1 लाख 56 हजार 925 कोटींची घट अपेक्षित आहे.
निर्मिती व बांधकाम क्षेत्रालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. निर्मिती क्षेत्रात 11.8 टक्के तर बांधकाम क्षेत्रात 14.6 टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
कोरोना महामारीचा प्रामुख्याने व्यापार, हॉटेल्स आणि वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाल्याचे दिसून येत असून या क्षेत्रात 9 टक्के घट होण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्रात दिलासादायक बाब घडली असतानाच पशुसंवर्धन, वने व लाकूडतोडणी आणि मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रांमध्ये अनुक्रमे 4.4 टक्के, 5.7 टक्के व 2.6 टक्के वाढ अपेक्षित आहे.

मॅग्नेटिक महाराष्ट्रात 1 कोटी 13 लाखांची गुंतवणूक अडीच लाख रोजगार

या आर्थिक पाहणी अहवालानुसार एप्रिल 2000 ते सप्टेंबर 2020 पर्यंत देशात थेट परदेशी गुंतवणूक 8 लाख 18 हजार 522 कोटी रुपये असून ती 27.7 टक्के होती. सन 2020-21 मध्ये सप्टेंबरपर्यंत 27 हजार 143 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणुकीची भर पडली आहे. त्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत 2020 मध्ये 1.13 लाख कोटांची गुंतवणूक झाली असून त्यात 2.50 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत.

राज्यावरील कर्ज वाढले

उत्पन्नातील घट व कोविड व नैसर्गिक आपत्तीचा आकस्मिक भार यामुळे वाढलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करताना राज्याला कर्जाचा आधार घ्यावा लागला आहे. त्यामुळे राज्यावरील कर्जाचा भार 5 लाख 20 हजार कोटींवर पोहचला आहे.

दरडोई उत्पन्नात घट

राज्याचे दरडोई उत्पन्न मागील वर्षी 2 लाख 2 हजार 130 रुपये होते. ते उत्पन्न या आर्थिक वर्षात 1 लाख 88 हजार 784 रुपयांपर्यंत खाली घसरले आहे. दरडोई उत्पन्नात हरयाणा, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू नंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर पोचला आहे.