
लॉकडाऊनमुळे लग्न सोहळ्यांवर अनेक बंधने आहेत. वेळेची मर्यादा, ठराविक लोकांची उपस्थिती आदी नियमांचे पालन करून लग्न सोहळे पार पडतात. अशा परिस्थितीत काही जोडपी लग्नासाठी अनोखी शक्कल लढवत आहेत. करमाळ्याची नवरी आणि गुवाहाटीचा नवरा यांनी लॉकडाऊनमुळे अमेरिकेत लग्नगाठ बांधली. तब्बल 150 आप्तेष्टांनी हिंदुस्थानातून लग्नाला ऑनलाईन उपस्थिती लावत नवदांपत्याला शुभाशीर्वाद दिले आहेत.
माधुरी नगरे ही करमाळ्यातील डॉ. महेंद्र आणि रोहिणी नगरे यांची कन्या आहे. ती अमेरिकेतील पर्डू युनिव्हर्सिटीत इंजिनियरिंगमध्ये पीएचडी करतेय. येथे तिची ओळख गुवाहाटीच्या सौभिक सितांशू देब याच्याशी झाली. सौभिक हादेखील सिएटल शिकागो येथे इंजिनियरिंगमध्ये पीएचडी करतोय. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि सौभिकने माधुरीला लग्नासाठी मागणी घातली. दोन्ही कुटुंबाकडून या लग्नाला होकार मिळाला. कोरोनामुळे लग्नात अडचण येऊ लागली. मात्र कोरोनाच्या संकटावर मात करीत घरातल्यांच्या परवानगीने त्यांनी अमेरिकेतच लग्नाचा निर्णय घेतला. 8 जूनला हे जोडपे लग्नबंधनात अडकले आहे. अमेरिकेत रजिस्टर पद्धतीने त्यांनी लग्न केले. गुवाहाटी आणि करमाळ्यातून 150 नातेवाईकांनी तर नवरीचा भाऊ आणि वहिनीने जर्मनीतून लग्नाला ऑनलाईन हजेरी लावली.



























































