
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे पालिकेच्या सहा रुग्णालयातील 168 कोरोनाबाधितांचे प्राणवायू उपलब्ध असलेल्या ठिकाणी सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.
कोरोना संसर्ग बाधितांना वैद्यकीय उपचार देताना प्राणवायूची गरज वाढली आहे. मात्र रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्यामुळे संपूर्ण राज्यात ऑक्सिजन वितरण करताना शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या ठिकाणी रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर वांद्रे भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालय, जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालय या सहा रुग्णालयातून एकूण 168 रुग्णांना इतर रुग्णालये/समर्पित कोविड आरोग्य पेंद्रात सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले आहे.
यामध्ये गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातील 44 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यासाठी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी पाठपुरावा केला. महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन अधिकाऱयांना आवश्यक सूचना देऊन कार्यवाही केली.

























































