कोरोनातही इंदापूरमधील शिक्षिकेचा ‘टेक्नोसॅव्ही उपक्रम’, विद्यार्थ्यांसाठी बनविले 130 व्हिडिओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दोन वर्षांपासून राज्यभरातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. मात्र, अशाही परिस्थितीत ज्ञानदानाच्या कामाशिवाय शांत न बसण्याचा संकल्प एका शिक्षिकेने केला होता.

विद्यार्थ्यांची शिकण्याची नाळ कायम राहावी यासाठी त्यांनी शालेय उपक्रमाचे 130 व्हिडिओ आणि तब्बल 5 हजारांवर पोस्टर बनवून त्यांना ऑनलाईनरित्या धडे दिले. इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सणसर केंद्राच्या भोसले वस्तीवरील शिक्षिका सुवर्णा ठोंबरे असे त्यांचे नाव आहे.

राज्यभरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, घरी बसून विद्यार्थ्यांचे नुकसान होउ नये यासाठी ऑनलाईनरित्या त्यांना धडे देण्याचा ध्यास शिक्षिका सुवर्णा ठोंबरे यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्हिडिओ बनविण्यासाठी सुरूवात केली. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील विविध व्हिडिओतून विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेत समजेल असे छोटे छोटे व्हिडिओ तयार केले. संबंधित व्हिडिओ पालकांच्या मोबाईलवर पाठवून त्यांना अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.

त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पाच हजारांवर इ-कार्ड बनवून गावातील तरूणांच्या ग्रुपवर व्हायरल केले. त्यामुळे ऐन कोरोनातही पुणे जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना घरीबसून टॅक्नोसॅव्ही उपक्रमाचे धडे गिरवण्यास मदत झाली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईनरित्या शिक्षण देण्यासाठी दररोज वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तयार करून ठोंबरे यांनी गावकऱ्यांची वाहवा मिळविली आहे. टॅक्नोसॅव्हीचा पुरेपुर वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही अभ्यास करवून घेण्यास भाग पाडले आहे.

घरोघरी शाळेचाही उपक्रम

मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी ज्ञानदीप लावू घरोघरी उपक्रमात मुलांच्या घरी जाऊन शिक्षण देण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करून घरोघरी पोहोचविले आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यास मदत झाली आहे.

उपक्रमा आधी त्यांनी आईची शाळा ,ओसरी शाळा, शिक्षक आपल्या दारी , शिक्षक मित्र असे उपक्रम राबवले आहे. ऑनलाईन शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती सहभाग घेऊन तालुक्यातील शैक्षणिक चॅनेलसाठी 130 व्हिडिओ आणि ई शैक्षणिक साहित्याचे पाच हजार कार्ड बनवून रोज मुलांना गृपवर पाठविले जात आहे. या शैक्षणिक कार्यासाठी त्यांना गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, विस्तार अधिकारी दिलीप बोरकर, केंद्र प्रमुख मनोहर सांगळे यांनी मदत केली.

कोरोना संकटामुळे प्राथमिक शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शालेय प्रवाहाबाहेर जाण्याची भीती होती. त्यामुळे त्यांना ऑनलाईनरित्या शिक्षण देण्यासाठी विविध भाषेतील व्हिडिओ तयार केले. संबंधित व्हिडिओ आणि इ-कार्ड पालकांसह अनेक गु्रपवर व्हायरल केले. त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास मदत झाली. ऐन कोरोना कालावधीत बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हिडिओद्वारे शिक्षण दिल्यामुळे समाधान मिळाले आहे.
सुवर्णा ठोंबरे, शिक्षिका, भोसले वस्ती, सणसर केंद्र