
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मुंबईहून चंदगड येथे आलेल्या 30 वर्षीय महिलेसह 11 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाच्या मुलीचा त्यात समावेश आहे.चंदगडमध्ये एक आणि आजरा तालुक्यात दोन असे मुंबईहून आलेले तीन रुग्ण शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर सोमवारी शाहुवाडी तालुक्यात दोन आणि पन्हाळा तालुक्यात एक असे तिघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
बुधवारी पुन्हा तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 25 जण कोरोनाबाधीत झाले आहेत. यापैकी इचलकरंजी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 10 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी आढळलेल्या तीन रुग्णांमुळे चंदगड तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे. सर्वांवर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंदगड येथे आढळलेले तिघे रुग्ण मुंबईतील सांताक्रूझ येथून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांचा प्रवास झाला असून दोन दिवसांपूर्वीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.


























































