परभणीतील कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर; नवीन रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून संबधित कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास वैद्यकीय समुपदेशकामार्फत समुपदेशन करण्यात येत आहे. जिल्हयामध्ये जिल्हा रुग्णालयामार्फत पथक तयार करून पथकामार्फत ग्रामीण व तालुका स्तरावरील रेफ्युजी कॅम्पमधील दाखल असणाऱ्या रहिवाशांचे वैद्यकीय समुपदेशन करण्यात येत आहे. सोमवारी परभणी जिल्ह्यामध्ये एकही नवीन संशयीत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सोमवारी कोरोना विषाणू संदर्भात सायंकाळी 5 वाजेपर्यंत परभणी येथील जिल्हा रुग्णालयात 543 संशयितांची नोंद झाली. एकूण घेण्यात आलेले स्वॅब 481 व त्या पैकी 415 निगेटिव्ह असून त्यापैकी 1 पॉझिटिव्ह असून 48 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आजतागायत 17 स्वॅब राष्ट्रीय विषाणु संस्था व संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाने तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. वरील 481 स्वॅबपैकी सोमवारी एकूण 26 संशयितांचा नमुना ( स्वॅब ) तपासणीसाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, संभाजीनगर येथे पाठविण्यात आला आहे. सोमवारी नव्याने दाखल झालेले एकूण संशयित 14, एकूण नोंद झालेले संशयित 543, पैकी विलगीकरण केलेले 248, हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य कक्षात 41, विलगीकरणाचा कालावधी पुर्ण झालेले 254, नोंद झालेल्या एकूण 543 पैकी परदेशातून आलेले 62 आणि त्यांच्या सपंर्कातील 6 याप्रमाणे आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.