मुंबईत 10 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 1,800 ने वाढली

मुंबईत गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या 10 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे 1800 ने वाढली आहे. सक्रिय रुग्णांची 10 दिवसांपूर्वी 1 हजार 955 वर असलेली संख्या सध्या 3 हजार 818 वर पोहोचली आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्याही बुधवारी अचानक दुपटीने वाढली, मात्र आज पुन्हा 200 ने कमी झाली. मात्र बुधवारी सक्रिय रुग्णांची संख्या 400 ने वाढून ती 3 हजार 545 वर पोहोचली. सक्रिय रुग्णांच्या संख्येत आज पुन्हा आणखी 300 ने वाढ होऊन ही संख्या 3 हजार 818 वर पोहोचली. दरम्यान, मुंबईत आज दिवसभरात 683 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. 639 रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. 44 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर 13 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले आहे. दिवसभरात 409 जण कोरोनामुक्त झाले.

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा

सणासुदीचा काळ सुरू आहे. मोहरम, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा झाले असून येत्या काही दिवसांत दहीहंडीबरोबर सर्वात लोकप्रिय गणेशोत्सवही येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी फिरताना शक्यतो मास्कचा वापर करावा तसेच 12 वर्षांपासून पुढील सर्व वयोगटांसाठी सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आली आहे ती घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.