कोरोनाने हिंदुस्थानींच्या आयुष्यातील दोन वर्षे कमी झाली, ‘आयआयपीएस’चा धक्कादायक अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने जगाचे नुकसान केले. दोन वर्षांत जगातील लाखो नागरिक या आजाराने दगावले. अजूनही त्याचे थैमान सुरूच आहे. मधेच थंडावतो आणि पुन्हा उसळतो. जगाला हैराण करून सोडलेल्या या आजाराचे दूरगामी परिणाम भोगावे लागणार आहेत. एका अभ्यासानुसार कोरोनामुळे हिंदुस्थानींच्या आयुष्यातील दोन वर्षे कमी झाली आहेत.

इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉपुलेशन स्टडीज (आयआयपीएस) या आंतरराष्ट्रीय संस्थेतील तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार हिंदुस्थानी नागरिकांच्या आयुष्यातील दोन वर्षे कोरोनाने हिरावून घेतली आहेत. हिंदुस्थानी पुरुषांचे आयुर्मान 69.5 वर्षे होते ते आता 67.5 वर्षांवर आले आहे. हिंदुस्थानी महिलांचे सरासरी आयुष्य 72 वर्षे होते ते 69.5 वर्षांवर आले आहे असा निष्कर्ष या अभ्यास अहवालात मांडला गेला आहे.

‘आयआयपीएस’चे सहाय्यक प्राध्यापक सूर्यकांत यादव यांनी हा अभ्यास केला. ‘बीएमसी पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत 39 ते 69 वयोगटातील सर्वाधिक मृत्यू झाले असे या अहवालात नमूद आहे. कोरोनाने देशातील मृत्युदरातही वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

प्रत्येक नव्या आजारात वाढतो मृत्युदर

कोणताही नवा आजार आला की मृत्युदर वाढतो असे दिसून आले आहे. एचआयव्ही-एड्सने आफ्रिकन देशांमध्ये थैमान घातले होते तेव्हा तेथील मृत्युदर वाढला होता. परंतु एचआयव्ही नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा मृत्युदर कमी झाल्याचे दिसून आले होते, असे ‘आयआपीएस’चे संचालक डॉ. के. एस. जेम्स यांनी सांगितले.