
कोरोना व्हायरसचा परिणाम आरोग्य, अर्थव्यवस्था, पर्यटन अशा सर्वच घटकांना बसला आहे. यात आता चित्रपट आणि मालिका जगताचीही भर पडली आहे. कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद ठेवणं आवश्यक असल्याने अनेक चित्रपट पुढे ढकलण्यात आले आहेत. आता प्रादुर्भाव टाळण्यासाठी चित्रीकरण रद्द करण्यात आलं असल्याने बॉलिवूड आणि मालिकांना कोट्यवधींचं नुकसान होणार आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत बॉलिवूड, ओटीटी आणि टीव्ही क्षेत्रातील चित्रीकरणं रद्द करण्यात आली आहेत. इम्पा, व्हिप्फासह अनेक चित्रपट आणि मालिका मंडळांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, सलग 13 दिवस चित्रीकरण रद्द झाल्यामुळे बॉलिवूड आणि मालिका जगताचं कोट्यवधींचं नुकसान होणार आहे. हा आकडा मालिकांसाठी 100 कोटी तर चित्रपटांसाठी तब्बल 800 ते 1 हजार कोटी इतका असणार आहे.
अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी 1 एप्रिल पासून स्थिती पूर्ववत होणार की नाही, याची काहीही शाश्वती नसल्याची भीती व्यक्त केली आहे. जर परिस्थिती कायम राहिली तर नुकसानाचा आकडा वाढण्याची चिंताही मनोरंजन विश्वाला सतावत आहे.






























































