
कोरोना महामारीत एकटेपणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात राग, चिडचिडेपणा तसेच आत्महत्येचा विचार डोक्यात येणे हे एकाकीपणाचे परिणाम दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये घरातून काम करणे, सामाजिक पातळीवर एकत्र येण्यावर निर्बंध, तासन्तास घरात बसून राहणे अशा कारणांमुळे ही समस्या वाढली आहे.
सोशियोलॉजिस्टच्या मते कोरोना महामारीत पुरुषांवर तणाव वाढला आहे. त्यामुळे एकटेपणा, नैराश्य या समस्यांनी डोके वर काढले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष मानसिक ताणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम गंभीरतेने घेत नाहीत. ते परिणामांकडे दुर्लक्ष करून नैराश्य व एकटेपणाला सामोरे जातात. महिला आणि पुरुषांमध्ये नैराश्याची (डिप्रेशन) समस्या एकसारखीच असते, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका अभ्यासातून काढण्यात आला आहे. ब्रिटन मेंटल हेल्थ अवेअरनेस ऑर्गनायझेशनने 2015 मध्ये एक हजार पुरुषांचा सर्व्हे केला होता. त्यात 77 टक्के पुरुष नैराश्य आणि स्वतःच्याच विश्वात गुंग असणे अशा समस्यांनी त्रस्त असल्याचे आढळले होते. एकटेपणामुळे आत्महत्येचा विचार डोक्यात येत असल्याचे 40 टक्के पुरुषांनी सर्वेक्षणावेळी सांगितले होते.
नोकऱया गेल्याने तरुणांना चिंतेने ग्रासले
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मोठय़ा प्रमाणावर तरुणांना नोकऱया गमवाव्या लागल्या. त्यामुळे बेरोजगार झालेल्या तरुणांबरोबरच नोकरीत अजून टिपून राहिलेल्या तरुणांनाही चिंतेने ग्रासले आहे. तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. जगभर ही परिस्थिती आहे. अमेरिकेत 60 टक्क्यांहून अधिक तरुण बेरोजगार झाले आहेत.
नैराश्यावर तज्ञांनी सुचवलेले उपाय
– एकटेपणा दूर करण्यासाठी ‘इमोशनल सेफ्टी नेट’ बनवा. नैराश्य आलेल्या लोकांनी समविचारी लोकांचा ग्रृप जॉईन करावा.
– मित्र वा नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, जेणेकरून तेथे आपल्याला एकटेपणाच्या भावना व्यक्त करता येतील. यातून मानसिक शांती, समाधान लाभेल.
– नकारात्मक लोकांशी संपर्प टाळा. ही मंडळी तुमच्या भावना समजून घेण्याऐवजी डोकेदुखी आणखी वाढवतील.




























































