कोकणातून परतलेल्यांनी आणली ‘कोरोना’ची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील वर्षी कोरोना निर्बंधांमुळे गणपतीला गावी जाता न आलेले चाकरमानी यंदा झाडून कोकणात दाखल झाले. आरटीपीसीआरची अट तसेच अन्य अटींचे सोपस्कार पार पाडून भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करून चाकरमानी 15 तारखेपासून मुंबईत परतू लागले. 17 हजारहून अधिक चाकरमानी कोकणात दाखल झाले. मात्र त्यापैकी 272 जणांना कोरोना झाल्याची माहिती सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

रत्नागिरी जिह्यात आलेल्या 1 लाख 30 हजार जणांपैकी 90 हजार जण कोरोना चाचणी करून आणि दोन लसमात्रा घेऊन आलेले होते. 40 हजार जण चाचणीसाठी पात्र होते, परंतु त्यातील साधारण 20 हजार जण 18 वर्षांखालील होते, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली. उर्वरित 20 हजार जणांपैकी 120 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत आढळून आले. त्याव्यतिरिक्त 72 जणांना कोरोनासदृश लक्षणे होती. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, रेल्वे, एसटी, खासगी वाहनांतून 87 हजार 837 जण जिह्यात दाखल झाले. त्यातील 30 हजार 216 जणांनी दोन लसमात्रा घेतल्या होत्या. 20 हजार जणांचे कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आले. जिह्यात आठ हजार 104 जण तपासणी न करताच आले. त्यांची आरोग्य चाचणी करण्यात आली असता 152 जण कोरोनाबाधित आढळले.