
कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे लहान बालकांसंबंधीची आवश्यक माहिती आतापासूनच तयार करण्यात यावी. लहान मुलांच्या उपचारासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 10 व्हेंटिलेटर खरेदीची प्रक्रिया राबवावी. लहान मुलांना कोविडनंतर म्युकरमायकोसिसचा धोका अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे या संबंधीची औषधेही उपलब्ध करून ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट 11 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. हे दिलासादायक चित्र असून, हा रेट आणखी खाली आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नशील राहावे, असे सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्याचप्रमाणे म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करावेत. यापूर्वी जिल्ह्यात 53 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. आता कोरोना पॉझिटिव्हिटीचा रेट कमी आल्यामुळे दिवसाला 34 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. तसेच, जिल्ह्यात सुमारे 1500 रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.
अनलॉकमध्ये सांगली चौथ्या टप्प्यात
जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिलासादायक जरी असली तरीही राज्य शासनाच्या अनलॉकच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. यामध्ये येत्या काळात सुधारणा होऊन वरील टप्प्यात जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नशील राहावे. जिल्ह्यात जानेवारी ते आतापर्यंत सुमारे 5 लाख 16 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत दिवसाला 7 ते 8 हजार कोरोना चाचण्या होत आहेत. या चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात यावे, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
सामाजिक संस्थांच्या कोविड सेंटरचा शासनाला हातभार
सांगली जिल्ह्यात कोरोना रेट 6 ते 7 टक्क्यांपर्यंत आला आहे. तथापि, तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोकमान्य चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर संचालित स्व. मदन (भाऊ) पाटील डेडिकेटड कोविड हेल्थ सेंटरचा कोविड रुग्णांसाठी चांगला उपयोग होईल. अशा समाजिक संस्थांकडून उभारण्यात येणाऱया कोविड सेंटरमुळे शासनाला चांगलाच हातभार लागत आहे. त्यामुळे शासनावरचा काहीसा भार हलका होत आहे, असे मत पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, संजय बजाज, जितेश कदम, तुकाराम मासाळ उपस्थित होते.






























































