
मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्सचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत असून राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून विविध निर्बंध घालण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉनवर यंदाही अनिश्चिततेचे दाट सावट आहे. 2004 सालापासून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. जगभरातील आघाडीचे मॅरेथॉनपटू या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मायानगरी गाठतात. मागील वर्षी कोरोनामुळे ही मॅरेथॉन रद्द करणे भाग पडले होते. यंदा मुंबईतील कोरोनाचा धोका कमी होऊन मॅरेथॉनचे नियमितपणे आयोजन करता येईल, अशी संयोजकांना आशा होती. मात्र कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रोनमुळे दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने विदेशी नागरिकांसाठी प्रतिबंध अधिक कडक करण्यात आले असल्याने यंदाही मुंबई मॅरेथॉनला परवानगी मिळणे मुश्कील वाटत आहे.

























































