
कोरोनावर उपचार केल्यानंतर वापरण्यात आलेले साहित्य रस्त्यावर फेकून दिल्याची खळबळजनक घटना आज नगरमध्ये उघडकीस आली. तारकपूर बस स्टॅण्ड, शहर वाहतूक गेट आणि सिव्हील हॉस्पिटलच्या वॉल कंपाउंडजवळ हा कचरा आढळून आला आहे. दरम्यान, याची गंभीर दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई सुरू केली आहे.
शहरातील रुग्णालयांनी वैद्यकीय क्षेत्राला लागणाऱया औषधांचा वापर झाल्यानंतर त्याचा कचरा महापालिका वाहनांमध्ये द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, आज तारकपूर बसस्थानक, शहर वाहतूक गेट आणि सिव्हील हॉस्पिटलच्या वॉल कंपाउंडजवळ हा कचरा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱया औषधांचा वापर झाल्यानंतर रस्त्यावर टाकून देण्याच्या धक्कादायक प्रकाराची माहिती समजताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई सुरू केली आहे.
या संदर्भामध्ये महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरागे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्ही सदरचा कचरा उचलण्यासाठी तत्काळ महापालिका कर्मचाऱयांना पाठविले आहे. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

























































