
सर्वांना प्रतीक्षा असलेल्या कोरोना लसीकरणाला आज 16 जानेवारीपासून देशभरात सुरुवात होत आहे. ‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ होणार आहे. मुंबईत पालिकेच्या माध्यमातून 9 केंद्रांवर सकाळी 9 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत लसीकरण होणार आहे. पहिले दोन दिवस 4 हजार जणांना लस देण्यात येणार असून यानंतर लसीकरणाची संख्या वाढविण्यात येणार आहे.
दरम्यान, विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ करण्यात येईल. मुंबईत कोरोना लसीकरणासाठी पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त पश्चिम उपनगर सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली शहर कृतीदल स्थापन करण्यात करून कार्यवाही करण्यात येत आहे.
लसीकरणासाठी पालिकेने सात हजार कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिले आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार 517 जणांना लस दिली जाणार असून पोर्टलवर आतापर्यंत 1 लाख 32 हजार 142 हेल्थ वर्करची नोंदणी केली आहे. लसीकरणासाठी 18 मास्टर ट्रेनर्स, 1452 स्टाफ नर्स, 2357 इतर टीम मेंबरना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटकडून आलेल्या 1 लाख 39 हजार 500 कोविड लसीचे डोस मुंबईत दाखल झाले असून पालिकेच्या एफ साऊथ परळ वॉर्ड ऑफीस येथील कोल्ड स्टोरेज सेंटरमध्ये साठवणूक करण्यात आली आहे.
या लसीकरणासाठी 9 केंद्रांवर या लसी शुक्रवारीच पाठवण्यात आल्या आहेत. बीकेसी कोविड सेंटरमध्ये सकाळी 10.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाची सुरुवात होईल. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पाहिले दोन दिवस 4 हजार जणांना लस देण्यात येणार असून यानंतर संख्या वाढवण्यात येणार आहे.
दरम्यान, लसीकरणाठी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते मुंबईत ठिकठिकाणी लससाठा रवाना करण्यात आला. यावेळी आमदार मनीषा कायंदे, आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, नगरसेवक अनिल कोकिळ, सचिन पडवळ, दत्ता पोंगडे, नगरसेविका सिंधू मसुरकर, उर्मिला पांचाळ, आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. मंगला गोमारे आदी उपस्थित होते.
साईड इफेक्ट झाल्यास तज्ज्ञांची टीम तैनात
लसीकरणाच्या ठिकाणी साइडइफेक्ट झाल्यास खबरदारी म्हणून कार्डिओलॉजिस्ट, गायनॅकोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची टीमसह व्हेंटिलेटर, आयसीयू तैनात असेल. तसेच लसीकरणाबाबत भीती घालवण्यासाठी समुपदेशकही उपलब्ध राहणार आहे.
असे होणार लसीकरण
लाभार्थी व्यक्तींना लसीकरणासाठी एक दिवस आधी एसएमएस पाठवला जाणार आहे. या एसएमएसमध्ये लसीकरणाचे ठिकाण, बुथ क्रमांक, लस देणाऱ्या डॉक्टरचे नाव आणि वेळ याची सर्व माहिती देण्यात येणार आहे.
पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणाऱ्या दुसऱ्या डोसचा रिमाइंडर लाभार्थ्यांना पोर्टलवरून स्वयंचलित पद्धतीने जाणार आहे.
या ठिकाणी होणार लसीकरण
1) नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल
2) केईएम रुग्णालय, परळ
3) शीव रुग्णालय, शीव
4) कूपर रुग्णालय, विले पार्ले
5) व्ही. एन. देसाई रुग्णालय, विले पार्ले
6) वांद्रे भाभा रुग्णालय
7) डॉ. आंबेडकर शताब्दी रुग्णालय, कांदिवली
8) राजावाडी रुग्णालय, घाटकोपर
9) बीकेसी कोविड सेंटर































































