
कोरोना लढय़ात लसीकरण एक मोठे प्रभावी शस्त्र म्हणून सिद्ध झाले आहे. कोरोना संसर्गाने हिंदुस्थानातील आणखी तब्बल 42 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला असता. ही संभाव्य मनुष्यहानी कोरोना प्रतिबंधक लसींच्या डोसपासून भक्कम संरक्षण मिळाल्यामुळे टाळता आली, असा निष्कर्ष ‘द लॅन्सेट’ या जर्नलच्या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. लसीकरणामुळे देशातील प्रत्येकी 10 हजार लोकांमागे जवळपास 24 लोकांचे प्राण वाचले, असेही सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले आहे.
इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानातही कोरोना महामारीत मोठी मनुष्यहानी झाली. महामारीच्या सुरुवातीला कुठलेही औषध वा लस नसल्यामुळे संसर्ग जीवावर बेतला. मात्र कोरोना प्रतिबंधक लस विकसित झाल्यानंतर मृत्यूदर नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. ‘द लॅन्सेट’ या जर्नलच्या सर्वेक्षणानुसार, कोरोना लसीकरणामुळे जागतिक पातळीवर दोन कोटींहून अधिक लोकांना कोरोनाच्या प्राणघातक संसर्गावर मात करता आली आणि त्यांचे प्राण वाचले. कोरोना लस वापरात आल्यानंतर पहिल्या वर्षी लसींमुळे जवळपास 1.98 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका टळला. याचवेळी हिंदुस्थानात 42 लाख 10 हजार लोकांचे प्राण वाचवण्यात लस प्रभावी ठरली. कोरोना काळात 185 देशांत झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीचा अभ्यास करीत ‘द लॅन्सेट’ जर्नलने सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. 8 डिसेंबर 2020 ते 8 डिसेंबर 2021 या कालावधीत लसींच्या मदतीने वाचवलेल्या लोकांच्या संख्येच्या आधारे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
- जागतिक आरोग्य संघटनेने 2021 च्या अखेरपर्यंत प्रत्येक देशातील जवळपास 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले होते. त्या गतीने जर लसीकरण झाले असते तर जागतिक पातळीवर आणखी 5 लाख 99 हजार 300 लोकांचे प्राण वाचले असते.
- हिंदुस्थानात कोरोना संसर्गामुळे 51 लाख 60 हजार लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. सध्या नोंद झालेल्या कोरोनाबळींच्या तुलनेत हे प्रमाण दहापटीने अधिक आहे. सरकारच्या नोंदीनुसार, देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 941 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.



























































