
कोविड प्रतिबंध लसीचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा बुधवारी जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे गुरुवारी मुंबईतील 73 पैकी 40 खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. तर उर्वरित 33 खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तेथे दुसऱया मात्रेसाठी (डोस) येणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा मिळाल्यास गुरुवारी मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे.
लससाठ्याच्या उपलब्धतेची ही वस्तुस्थिती पाहता गुरुवारी दुसरी मात्रा घेण्यास पात्र असणाऱ्यांनीच लसीकरणासाठी यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून करण्यात येत आहे. लससाठ्याचा ओघ वाढल्यानंतर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल, अशी अपेक्षा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 63 लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरी मात्रा (डोस) घेणाऱयांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेत दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
मुंबईतील लसीकरण मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवता यावी, त्यासाठी आवश्यक लससाठा उपलब्ध व्हावा, याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या अनुषंगाने, बुधवारी रात्री उशिरापर्यंत सरकारकडून काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत लससाठा उपलब्ध झाला तर गुरुवारी सकाळी लससाठा वितरण करण्यात येईल. त्यानंतर महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरणास सुरु होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला 25 एप्रिलपर्यंत एकूण 24 लाख 58 हजार 600 इतक्या लस उपलब्ध झाल्या. पैकी, 24 लाख 10 हजार 860 लस उपयोगात आल्या. म्हणजेच 47 हजार 740 इतका लससाठा बुधवारी लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता. लस उपलब्धतेबाबतची सद्यस्थिती लक्षात घेता, सर्व संबंधितांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






























































