कोरोना व्हायरसपासून बचावासाठी होतोय कंडोमचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसने सध्या जगभरात हाहाकार माजवला आहे. चीन व चीनच्या आजुबाजुच्या देशांमध्ये या व्हायरसचा फैलाव होत आहे. या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोकं वेगवेगळे उपाय अवलंबत आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी संत्र्याच्या सालीच्या मास्कचा वापर होत होता. आता सिंगापूरमध्ये कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून लोकं कंडोम वापरत आहेत.

चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका सिंगापूरला बसला आहे. तिथे 52 जणांना या व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे या देशात कोरोनाची भीती पसरली आहे. कोरोना व्हायरसमुळे मास्क व हाताचे ग्लोव्हज मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. त्यामुळे तिथे मास्क व ग्लोव्हजची कमतरता होत आहे. त्यामुळे आता लोकांनी ग्लोव्हजच्या ऐवजी कंडोमचा वापर सुरू केला आहे. कंडोम वापरून लोकं लिफ्टचे बटन दाबणे, गेट खोलणे बंद करणे, एटीएमचा वापर करणे अशा प्रकारची कामं करत आहेत.

चीनमध्ये सध्या मास्कसाठी अचानक मोठी मागणी निर्माण झाली आहे. पण, एकूणच चीनची लोकसंख्या आणि मास्कचा पुरवठा यांच्या प्रमाणाचा मेळ न बसल्याने अनेक जणांना मास्क मिळालेले नाहीत. त्यामुळे चिनी लोकांनी वेगवेगळ्या शकला वापरत मास्क तयार केले आहेत. तोंड झाकण्यासाठी मास्क कमी पडल्याने फळे, प्लास्टिक, कागद, कापड अशा निरनिराळ्या वस्तुंचा वापर केला जात आहे.