
ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले, आजारी व्यक्ती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार हिंदुस्थानात तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसून आले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये 10 पैकी 6 रुग्ण 40 वर्षांखालील असल्याचे दिसून आले आहे. 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांचे प्रमाण 62.5 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उपक्रमातंर्गत रुग्णालयात दाखल असलेल्या 2 लाख रुग्णांच्या आकडेवारीतून ही माहिती मिळाली आहे.
देशातील आणि जगातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. कोरोनाचे संक्रमण होण्यामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. हिंदुस्थानात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या एक लाखावर गेली आहे. मृतांमध्ये 53 टक्के रुग्णांचे वय 60 पेक्षा जास्त होते. कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वृद्धांना लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. मात्र, नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात रुग्णालयात दाखल असलेल्या 60 वर्षांवरील कोरोनाबाधितांची संख्या 9 टक्के आहे. 21 ते 30 वय असलेले 25.84 टक्के रुग्ण आहेत. तसेच 31 ते 40 वय असलेले 22.48 टक्के रुग्ण आहेत. तर 90 वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण 0.09 टक्के आहे. या आकडेवारीवरून तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे दिसून येते.
कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता वृद्ध, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रीत करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. मात्र, आता तरुणांनाही कोरोनाचा धोका असल्याचे दिसून आले आहे. कोरोना व्हायरसचा फैलावण्याचा वेग जास्त असल्याने कोरोनाचा धोका वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. जगभरात आणि हिंदुस्थानात आढळलेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात फरक असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. हिंदुस्थानात तरुणांना कोरोना संक्रमणाचा जास्त धोका असल्याचे दिसून आले आहे. तसेच 60 वर्षांवरील आजारी व्यक्तींनीही काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
हायपरटेन्शन, मधुमेह, हृदयरोग, किडणी किंवा यकृतासंबंधी आजार असलेल्या कोरोनाबाधितांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 70 टक्के असल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच मृत्यू झालेल्यांमध्ये एकापेक्षा जास्त आजार असलेल्या व्यक्तींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजारी व्यक्तींनी संक्रमण होऊ नये, यासाठी जास्त काळजी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. हिंदुस्थानी व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याने देशात कोरोनाचा मृत्यूदर कमी आहे, ही दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

























































