हिंगोली जिल्ह्यात परदेशातून आलेले 10 नागरिक ‘होम क्वॉरंनटाईन’

2336

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात परदेशातुन दाखल झालेल्या 10 नागरिकांना होम क्वॉरंनटाईन अर्थात घरातच विलगीकरण करून ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

कोरोनाच्या संशयीत रुग्णांसाठी हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालय व जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत ग्रामिण रुग्णालय, आखाडा बाळापूर, सेनगाव आणि औंढा नागनाथ येथे तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वार्डामध्ये कुठलाही संशयीत रुग्ण दाखल झाला नसल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात परदेशातून अर्थात फिलीपीन्स येथुन-03 नागरिक तर ऑस्ट्रेलिया-02, कझाकिस्तान-01, सौदी अरेबीया-01, जर्मनी-01 आणि मालदिव येथून-02 असे एकुण 10 नागरिक आले आहेत. या सर्व नागरिकांना होम क्वॉरंनटाईन (घरात विलगीकरण) करण्यात आले आहे. होम क्वॉरंनटाईन मधील नागरिकांच्या हातावर होम क्वॉरंनटाईनचा शिक्का मारुन त्यांना 14 दिवस घरातच थांबण्याच्या लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच रॅपिड ॲक्शन टिममार्फत त्यांची दररोज विचारपूस करण्यात येत असून, या सर्व नागरिकांना कोरोना विषाणूची काही लक्षणे आढळल्यास त्यांना रॅपिड ॲक्शन टिममार्फत आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या