गणेशोत्सवातील गाठीभेटीत कोरोनाचा ‘प्रसाद’! निकट संपर्क वाढल्याने लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी गणेशोत्सवात वाढलेल्या भेटीगाठींमुळे ‘कोरोना’चा प्रसार वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरात सरासरी एक हजार नोंदवल्या जाणाऱ्य़ा रुग्णसंख्येत 27 ऑगस्टपासूनच वाढ होत आहे. सरासरी बाराशे ते तेराशेपर्यंत वाढणारी रुग्णसंख्या 3 सप्टेंबर रोजी 1526 तर 4 सप्टेंबर रोजी 1929 वर पोहोचली. आणखी आठ दिवस ही वाढ कायम राहील अशी शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्य़ा उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात आली आहे. मुंबईत 4 सप्टेंबरपर्यंत एकूण 152024 रुग्ण नोंदवले गेले असले तरी यातील 1 लाख 21 हजार 671 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईत आता 22 हजार 220 या सक्रिय रुग्ण आहेत. यातील 80 टक्क्यांहून जास्त रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तेदेखील लवकरच कोरोनामुक्त होतील असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र गणेशोत्सव काळात कोरोना रोखण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी नागरिकांनी घेतली नसल्याने बाधितांशी निकट संपर्क वाढल्याने पुन्हा किमान आठ दिवस रुग्णसंख्या जास्त नोंदवली जाण्याची शक्यता पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर गेले असून दुपटीचा कालावधी 77 दिवस झाला आहे.

अशी झाली वाढ

मुंबईत 23 ऑगस्ट रोजी 931, 24 – 743 आणि 25 ऑगस्ट रोजी फक्त 587 रुग्ण नोंदवले गेले. मात्र 27 ऑगस्ट – 1350, 28- 1217, 29-1432, 30-1237 तर 31 ऑगस्ट रोजी 1179 रुग्ण नोंदवले गेले. तर 1 सप्टेंबर रोजी 1142, 2 – 1622, 3 – 1526 आणि 4 सप्टेंबर रोजी 1920 इतकी रुग्णसंख्या नोंदवली गेली.

पालिकेची यंत्रणा सक्षम

कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी कठोर नियम घालून देण्यात आले होते. तरीदेखील आवश्यक प्रमाणात खबरदारी घेतली गेली नसल्याने निकट संपर्क वाढल्याने रुग्णवाढ होत आहे. यातच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर काळजी घेतली गेली नसल्याने रुग्णवाढीची शक्यता आहे.

यातच मुंबईत दररोज सहा हजार कोरोना चाचण्यांची संख्या आता दहा हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण जास्त आढळतील अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.