स्कूल बसने शालेय पुस्तकं घरपोच, वापरलेली पाठय़पुस्तके जमा करण्याचे पालकांना आवाहन

476

लॉकडाऊन मुळे पाठय़पुस्तकांची विक्री करणारी दुकाने बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पाठय़पुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्कूल बसमालकांनी घेतला आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशन ने पालकांना जुनी वापरलेली पाठय़पुस्तके जमा करण्याचे आवाहन केले असून ज्या पालकांना आपल्या पाल्यासाठी पाठयपुस्तके हवी असल्यास त्यांनी इयत्ता, माध्यम, विषय, पत्ता आदी माहीती व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवल्यास स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या वतीने पाठय़पुस्तकांची घरपोच डिलिव्हरी केली जाणार आहे.

स्कूलबसचालकाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर स्कूलबसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोबाइल क्रमांक आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवरूनच स्कूल बस ओनर्स असोसिएशन ने पालकांना जुनी पाठय़पुस्तके गरजू विद्यार्थ्यांसाठी देण्याचे आवाहन केले आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्याची वापरलेली पाठय़पुस्तके इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यायची आहे अशा पालकांनी स्कूलबसच्या व्हॉट्सअप ग्रुप वर मेसेज करायचा आहे हा मेसेज वाचून ग्रुप मधील इतर पालक या पाठय़पुस्तकांसाठी विचारणा करू शकतात. ज्या पालकांना पुस्तके हवी असल्यास त्यांनी विषय माध्यम इयत्ता व घरचा पत्ता आदी माहीती दिल्यास स्कूल बस चालक ती पाठय़पुस्तके घरपोच करतील.

पोलिसांनी परवानगी द्यावी

स्कूल बसच्या प्रत्येक मार्गावरील पालक स्कूलबसचालकासोबत व्हॉट्सऍप ग्रुप आहेत. काही पालकांनी ग्रुप वर वापरलेली पाठय़पुस्तके उपलब्ध होतील का अशी विचारणा केली होती. अनेक पालक आपल्या पाल्याची जुनी पुस्तके इतर विद्यार्थ्यांना देण्यास तयार आहेत. पोलिसांनी पुस्तकांच्या डिलिव्हरीची परवानगी दिल्यास योग्य ती खबरदारी घेऊन हे काम आम्ही पूर्ण करू- अनिल गर्ग, अध्यक्ष,  स्कूल बस ओनर्स असोसिएशन.

आपली प्रतिक्रिया द्या