प्रत्येक स्ट्रेनवर ‘मास्क’ प्रभावी! ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत तज्ञ डॉक्टरांनी मांडले मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा विषाणू सतत बदलतोय. डेल्टाचा प्रसार झपाटय़ाने होतोय. अशातच कोलंबियात कोरोनाचा आणखी एक नवीन स्ट्रेन सापडलाय. हा विषाणू बदलतच राहणार असून त्यापासून वाचायचे असेल तर प्रत्येक स्ट्रेनवर ‘मास्क’ हाच प्रभावी उपाय आहे. आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज असल्याचे मत आज ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ञांनी मांडले आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाइन वैद्यकीय परिषदेत आज कोरोना उपाययोजनांविषयी माहिती देतानाच राज्यातील नागरिकांच्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. या परिषदेत अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता हे सहभागी झाले होते. नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना डॉ. मेहुल मेहता म्हणाले, संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजेत. कोरोना गेला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळय़ात मोठय़ा संख्येने सहभागी होताहेत. मात्र यातून संसर्ग पसरण्याचीच शक्यता अधिक आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फ़ैलाव वेगाने होतो आहे. डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दुखणे अंगावर काढणे महागात पडेल – डॉ. संजय ओक

कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते. यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाइन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लेप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवन एनएसटूबरोबरच मलेरिया, लेप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही कोविड टास्क पर्ह्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवडय़ांचे दुखणे आहे. त्यातील दुसऱया आठवडय़ातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.

शाळा सुरू होण्याआधी दक्षता घ्या – डॉ. सुहास प्रभू

बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते. त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

ईसीजी, टुडी इकोत काही आढळल्यास उपचार करणे आवश्यक – डॉ. अजित देसाई

डॉ. अजित देसाई कोविडपश्चात लक्षणे ही मुख्यतः 4 ते 12 आठवडे असतात. सहा महिन्यांपर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घकाळची लक्षणे मानली जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाशेचा त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इकोमध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताणतणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला. त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरूपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ञांशी बोलण्याचा सल्ला डॉ. अजित देसाई यांनी दिला.

प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी- डॉ. शशांक जोशी

मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठय़ाच्या बाहेरच ठेवणे हे आपले सर्वांचे आद्यकर्तव्य असल्याचे टास्क पर्ह्सचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱया लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पाहायला मिळाली.  दुसऱया लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या 20 पेक्षा अधिक आढळले नाहीत. हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी म्हणाले.

ओला मास्क घालू नका – डॉ. राहुल पंडित

पहर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क रुग्णांना जपण्याची आवश्यकता आहे. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका, अशा सूचना त्यांनी केल्या.