कोरोना नियंत्रणात येतोय; चार दिवसांत 636 सील इमारतींची कचाटय़ातून सुटका!

मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱया प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून सील इमारती आणि कंटेन्मेंट झोनची संख्याही झपाटय़ाने कमी होत आहे. गेल्या केवळ चार दिवसांत 636 सील इमारती आणि झोपडपट्टय़ा-चाळींतील 20 ठिकाणांची कठोर नियमांच्या कचाटय़ातून सुटका झाली आहे. शिवाय रुग्ण दुपटीचा कालावधी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.

अनलॉक टप्पा-4, गणेशोत्सव काळात मुंबईकर एकमेकांच्या संपर्कात येण्यात झालेली वाढ आणि चाचण्यांचे दुपटीने वाढलेले प्रमाण यामुळे मुंबईत जुलैमध्ये आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या ऑगस्ट व 20 सप्टेंबरदरम्यान वाढू लागली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम पालिकेने प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात रुग्ण शोधून आवश्यक कार्यवाही करण्यात येत असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत असून कंटेन्मेंट झोन आणि सील इमारतींची संख्याही घटत आहे.

अशी झाली सुधारणा
25 सप्टेंबरला चाळ व झोपडपट्टी परिसरात कंटेन्मेंट झोनची संख्या 686 होती?. त्यात घट होत 29 सप्टेंबरला ही संख्या 20 ने कमी होत 666 पर्यंत खाली आली आहे. तर इमारत अथवा इमारतीचे भाग सील करण्याची संख्या 25 सप्टेंबरला 10,871 होती. ही संख्या 636 ने कमी होऊन 29 सप्टेंबरला 10,235 झाली आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 12 दिवसांनी वाढला
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पुन्हा एकदा कोरोना आटोक्यात आला आहे. 15 दिवसांत रुग्ण दुपटीच्या कालावधीत 12 दिवसांची वाढ होत 30 सप्टेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी 66 दिवसांवर पोहोचला आहे.

रिकव्हरी रेट 82 टक्क्यांवर
25 सप्टेंबरला मुंबईत रुग्ण बरे होण्याची संख्या 1,169 होती. तर याच संख्येत वाढ होत 29 सप्टेंबरला रुग्ण बरे होण्याची संख्या 2,319 वर पोहोचली. 25 ते 29 सप्टेंबरदरम्यान रुग्ण बरे होण्याची संख्या तब्बल 1,150 नी वाढली असून एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82 टक्क्यांवर पोहोचले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या