
देशभरात कोरोना संक्रमण झालेले रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशभरातील रुग्णांची संख्या 70 हजारांवर गेली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी एक दिलासादायक वृत्त आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्युदरात घट होत असून दिवसाकाठी 100 हून 82 इतकी घट झाली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये देशभरातील मृतांचा आकडा 100 वर गेला होता. दोन्ही दिवशी देशातील कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 113 -113 इतकी होती. मात्र, त्यानंतर सोमवारी दिलासादायक चित्र दिसलं. सोमवारी हीच संख्या घटून 82 इतकी झाली. सोमवारी कोरोना रुग्णसंख्येतही घट झाल्याचं दिसून आलं.
रविवारी देशात 4308 नवे कोरोनाग्रस्त सापडले होते. ही संख्या आजवरची सर्वाधिक संख्या आहे. सोमवारी मात्र या आकड्यात घट झाली आणि 3607 नवीन रुग्ण सापडले. महाराष्ट्रातही रविवारी 1276 रुग्ण सापडले होते, तोच आकडा सोमवारी कमी होऊन 1230 इतका झाला. देशाचा मृत्युदरही 3.3 टक्के असून रुग्ण बरा होण्याची टक्केवारी 29 टक्के झाली आहे.



























































