
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पूर्णपणे रोखण्यासाठी महाराष्ट्र शर्थीचा प्रयत्न करत आहे. गावागावांनी आता या जीवघेण्या आजाराविरोधात तटबंदी करायला सुरुवात केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगांव, नेरूर पाठोपाठ आता पिंगुळी गावानेही कोरोनामुक्त होण्याचा निर्धार केला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पिंगुळीत सोमवारपासून पुढचे 6 दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 12 जूनपर्यंत पिंगुळीतील सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. एखादी व्यक्ती विनामास्क किंवा विनाकारण फिरताना आढळल्यास 200 रूपये दंड आकारून त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. पिंगुळीच्या सरपंच निर्मला पालकर-मोर्ये यांनी लॉकडाऊनबाबात माहिती दिली आहे.
लॉकडाऊन केव्हापासून लागू करायचा हे निश्चित करण्यासाठी शुक्रवारी पिंगुळी ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली होती. यावेळी सरपंच निर्मला पालकर-मोर्ये, ग्रामसेवक बी.आर. घुगे, तलाठी एस.बी. दरेकर, कृषी सहाय्यक एस.व्ही हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर, बाबल गावडे, सौ. दिव्या गावडे, सिद्धार्थ धुरी, व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर, उपाध्यक्ष दीपक गावडे, सचिव सतीश माडये आदी उपस्थित होते. या सभेमध्ये संपूर्ण पिंगुळी गावात सहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊन पार्श्वभूमीवर शनिवारी 5 व रविवार 6 जून या दिवशी दुकाने सकाळी सात ते अकरा पर्यंत सुरू राहतील व शासकीय नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल. सोमवार 7 ते शनिवार 12 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत गावातील सर्व दुकाने पूर्णतः बंद राहतील असं जाहीर करण्यात आलं आहे. सहा दिवसांनंतरही परिस्थितीत फरक पडला नाही तर लॉकडाऊन कालावधी वाढवण्यात येणार आहे.
काय आहे नियमावली
- सरकारी नोकरदारांना कार्यालयात जाण्यासाठी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक
- बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीची अँटीजेन टेस्ट बंधनकारक
- एखादी व्यक्ती पॉझिटीव्ह आल्यास त्याला ग्राम विलीनीकरण कक्षात 10 दिवस ठेवणे जाईल.
- गावातील डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स शासनाने सांगितलेल्या वेळेत सुरू राहतील.
- गावाबाहेरील व्यापारी गाड्या घेऊन गावात माल किंवा भाजी विक्री करताना आढळल्यास 15 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
- व्यावसायिक दुकाने व घरगुती दुकाने छुप्या पद्धतीने चालू आढळल्यास त्यांच्यावर 15 हजार रुपये दंड आकारला जाईल व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल


























































