
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील मुंबई, ठाणे शहरात राहणारे चाकरमानी आता जिल्ह्यात परत येण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कुसुबळे ग्रामपंचायतीने येणाऱ्या चाकरमान्यांचे स्वागत करत त्यांना क्वारंटाईन होण्याचे आवाहन केले आहे. आधी 15 दिवस क्वारंटाईन व्हा, नंतर गावात या, असे आवाहन ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने केले असल्याची माहिती उपसरपंच रसिका राजा केणी यांनी दिली आहे.
मुंबई, ठाणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईत सध्या भीतीचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील लाखो चाकरमानी मुंबई शहरात कामाधंद्यानिमित गेले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आता चाकरमानी आपला गाव बरा असे समजून चालत परत येत आहेत. त्यामुळे गावागावात सध्या येणाऱ्या चाकरमान्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे गावातील ग्रामस्थांना कोरोनाची लागण होऊ शकते, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील कुसुबळे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना मुंबई व इतर शहरातून येणाऱ्या नागरिकांची माहिती कळविण्यास सांगितले आहे. गावात येणारे गावकरी आमचे बांधव आहेत. त्यामुळे गावात येण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूवर मात करण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. गावात येणाऱ्या चाकरमान्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने बनविलेल्या कॅम्पमध्ये चाकरमान्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय केली असून 15 दिवस कॅम्पमध्ये क्वारंटाईन राहावे लागणार आहे. त्यानंतर त्यांना गावात प्रवेश दिला जाणार आहे. असे आवाहन कुसुबळे ग्रामपंचायत सरपंच मीना लोभी आणि उपसरपंच रसिका केणी यांनी केले आहे.
गाव तुमचे, गावातील बांधवही तुमचे, गावात खुशाल या पण गावातील बांधवासाठी 15 दिवस क्वारंटाईन व्हा, हे तुमच्या आणि गावाच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे. त्यामुळे गावात येणाऱ्या चाकरमान्यांची माहिती ग्रामपंचायतीकडे त्वरित कळवा असे उपसरपंच रसिका केणी यांनी ग्रामस्थांना आवाहन केले आहे.



























































