
जगभरात हाहाकार उडवून दिलेला कोरोना विषाणू महाराष्ट्रात देखील वेगाने पाय पसरत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 100 पार गेला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार काटेकोर उपाययोजना करत आहे. तसेच प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्ती देखील लोकांना आवाहन करत आहेत, प्रबोधन करत आहेत. जनता कर्फ्यु, जमावबंदी, संचारबंदी झुगारून रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांना आता संभाजीराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांनी आवाहन केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूविरुध्द लढताना संयमाने, धीराने, आणि युक्तीने मात केली आहे. आपणही सर्वजण या करोना शत्रूला हरवू शकतो,’ असे संभाजीराजे म्हणाले.
‘चला मावळ्यानो ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे. आपण एक सुज्ञ, जबाबदार नागरिक आहोत हे दर्शवण्याची ही एक संधी आहे. यासाठी सरकारने दिलेल्या सुचना काटेकोर पणे पाळा. उगाचंच निष्काळजी राहु नका. गर्दीत जाण्याचे टाळा. घराबाहेर पडू नका,’ असं आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

उदयनराजेंकडूनही आवाहन
पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचे काही नवे रुग्ण सापडल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले. ‘सातारा, सांगली येथे कोरोना रुग्ण सापडले असले तरी लोकांनी घाबरून, गडबडून जाऊ नये. लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे. आपले प्रशासन या रोगाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या हिमतीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे त्यांना आपल्या सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे,’ असे उदयनराजे म्हणाले.






























































